कसाब म्हणतो मी तर बच्चाच
Friday, 17 April 2009
१७ एप्रिल ला खटला ख-या अर्थाने सुरू झाला. कामकाज सुरू होताच विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तीवादाची सुरवात केली. ज्यात त्यांनी कसाबवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा मुख्य आरोप ठेवला. काही धक्कादायक माहितीही या दिवशी सर्वांसमोर आली. कसाबने दिलेला कबुली जबाब कोर्टापुढे सादर करण्यात आला. या कबुलीजबाबात कसाबने अतिरेक्यांना ट्रेनिंग सुरू असताना आमिर हफीज सईद आणि जकी उर रहमान लखवीने कश्मीर मुक्त करण्यासाठी आपण भारताविरुद्ध युद्ध पुकारणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही सज्ज आहात का असा प्रश्न विचारल्याचं म्हटलंय. याशिवाय अमेरिका ब्रिटन आणि इस्त्राइलला धडा शिकवण्यासाठी या देशांच्या मुंबईत आलेल्या नागरिकांना ठार करण्याचे आदेश मुजाहिदीनांना देण्यात आल्याचं निकम यांनी कोर्टाला सांगितलं. ट्रेनिंगमध्ये मेजर जनरल सहाबने कसाबचं टार्गेट अचूकपणे उध्वस्त केल्याबद्दल कौतुक केल्याचाही उल्लेख कबुलीजबाबात आहे. दुसरीकडे कसाबनेही तो लिंबूटिंबू नसल्याचं दाखवून दिलं. अब्बास काझमी या कसाबच्या वकीलांनी कोर्टापुढे कसाब हा अल्पवयीन असल्याचा अर्ज दाखल केला. मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला. (या अर्जामुळे रिपोर्टर्सच्या मनातही शंका निर्माण झाली होती की अशा अर्जांद्वारे खटला लांबतोय की काय, कारण याआधी अनेक खटल्यांमध्ये आरोपींकडून असे हातखंडे अवलंबल्याचं रिपोर्टर्सना माहीत होतं) यानंतर काझमी यांनी कसाबतर्फे कोर्टाला सांगितलं की कसाबला हा कबुलीजबाब माहित नाही आणि तो त्याच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतलाय.(हा पवित्राही काझमी घेणार हे रिपोर्टर्सना ठाऊक होतं, फक्त तो पवित्रा केव्हा घेणार हे माहित नव्हतं) काझमी यांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवलं. आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी त्यांनी धडपड करायला सुरवात केली आहे, कसाबही या कायद्याच्या खेळात सहभागी होऊन आनंदीत झाल्याचं दिसत होतं.
2 comments:
मुंबईवरील हल्ल्याप्रसंगी पोलिसांच्या तावडीत सापडलेला एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांचा सीएसटीमध्ये गोळीबार करून मलबार हिलचा 'व्हीआयपी' परिसरात गाठण्याचा कट होता, अशी धक्कादायक माहिती शनिवारी विशेष कोर्टापुढे झालेल्या सुनावणीदरम्यान सामोर आली आहे.
मलबार हिल परिसरात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, हायकोर्टाचे न्यायमूतीर् आदींसह विविध महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने आहेत. सीएसटी परिसरात दहशत माजवल्यानंतर हे दोघेजण कामा हॉस्पिटलच्या गल्लीतून नरिमन पाइंटच्या दिशेने गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना गाठायचा होता तो थेट मलबार हिलचा व्हीआयपी परिसर! त्या परिसरात ते नेमके काय करणार होते, हे कदाचित गुलदस्त्यातच राहील. कारण हा व्हीआयपी परिसर गाठण्याचा कट ज्याच्या डोक्यात शिजत होता, तो अबू इस्माईल पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे.
२६/११च्या हल्ल्याची सुनावणी न्या. एम. एल. ताहिलियानी यांच्यापुढे आर्थर रोड तुरुंगातील विशेष कोर्टात सुरू आहे. कसाबचा सहभाग स्पष्ट करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सीएसटी फायरिंगचा उल्लेख केला. या हल्ल्याविषयी तपशीलवार सांगताना कसाबच्या कबुलीजबाबाचा आधार घेत त्यांनी ही बाब उघड केली. सीएटीनंतर तुमचा कुठे जाण्याचा प्लॅन होता, असे कसाबला चौकशीदरम्यान विचारले असता त्याने 'मलबार हिल' असे उत्तर दिले. तिथे काय करणार होता, या प्रश्नावर त्याने इस्माईलचे नाव सांगितले. आपणही इस्माईलला सीएसटीनंतर कुठे जायचे, असे विचारले होते. त्यावर त्याने 'मलबार हिल', असे उत्तर दिले. वहा क्या करना है, असे कसाबने विचारले असता इस्माईलने 'वहा पहुचने के बाद बताऊगा,' असे उत्तर दिले.
दरम्यान, एकूण १ हजार ८२० साक्षीदारांपैकी केवळ ३३ प्रत्यक्षदशीर् आणि आणि १०३ साक्षीदारच याप्रकरणी तपासण्यात येणार असल्याचे अॅड. निकम यांनी कोर्टाला सांगितले. यात एफबीआयच्या काही परदेशी तज्ज्ञांच्या साक्षींचाही समावेश आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जिवंत पकडण्यात आलेला एकमेव आरोपी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांना दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील अत्यंत पॉश वसाहतीवर हल्ला करावयाचा होता. या परिसरात राज्यपालांचे निवासस्थान असलेले ‘राजभवन’, मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षां’ बंगला आणि अन्य मंत्र्यांचे बंगले आहेत. हा कट केवळ अबू इस्माईल यालाच माहीत होता आणि ते मलबार हिल येथे पोहोचण्यापूर्वीच इस्माईल पोलीस चकमकीत मारला गेला त्यामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही, असे आज अभियोग पक्षाच्या वतीने विशेष न्यायालयात सांगण्यात आले.
मलबार हिल येथे पोहोचल्यावर हल्ल्याच्या पुढील कटाची माहिती सांगतो, असे इस्माईलने अजमल कसाब याला सांगितले. मात्र ते मलबार हिल येथे पोहोचण्यापूर्वीच गिरगाव चौपाटीवर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यावेळी झालेल्या चकमकीत इस्माईल ठार झाला, असे आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्या. एम. एल. ताहिलीयानी यांना सांगितले.मुंबईवरील हल्ल्यात कसाब आणि त्याच्या साथीदारांचा हात आहे, हे सिद्ध करण्यासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि अन्य परदेशी तज्ज्ञांसह १०९ हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार असल्याचे आज अभियोग पक्षाच्या वतीने विशेष न्यायालयात सांगण्यात आले. त्यापैकी ३७ साक्षीदार हे प्रत्यक्षदर्शी असून त्यांनी कसाब व त्याच्या साथीदारांना हॉस्पिटल, हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बेछूटपणे गोळीबार करताना पाहिले आहे. वृत्तपत्रातील छायाचित्रांचा हवाला देत निकम यांनी न्यायाधीशांना, कसाबचा गोळीबार करतानाचा दहशतवादी चेहरा आणि आताचा निस्तेज चेहरा पाहा, असे सांगितले.या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये एके-४७ रायफल, आरडीएक्सचे बॉम्ब पेरणे, रॉकेट लॉन्चरचा वापर करणे, जीपीएस सॅटेलाईटचा वापर करणे आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचप्रमाणे पकडले गेलो तर चौकशीदरम्यान दिशाभूल करण्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून आता मी ‘बच्चा ’आहे, असा आव आणून दिशाभूल करण्याचाच कसाब प्रयत्न करीत आहे, असेही निकम म्हणाले.या खटल्यात १२ एफआयआर नोंदविण्यात आले असून त्यापैकी सातमध्ये कसाबचा प्रत्यक्ष सहभाग आहे. कुबेर या बोटीवरील खलाशांची हत्या करणे, सीएसटी स्थानकात बेछूट गोळीबार करणे, टॅक्सीत स्फोट घडविणे, कामा हॉस्पिटलजवळ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करणे, स्कोडा गाडी चोरणे, चौपाटीवर पोलिसांवर गोळीबार करणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. अभियोग पक्ष दोन भागांत पुरावे सादर करू इच्छितो, असे सांगून निकम म्हणाले की, कसाब आणि अन्य आरोपी यांच्यातील संबंध आणि कसाब आणि ठार झालेले अतिरेकी आणि फरारी आरोपी यांच्यातील संबंध, असे दोन भाग सादर करण्यात येणार आहेत.अत्यंत संवेदनक्षम अशा या खटल्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले असून त्यासाठी जवळपास १८२० साक्षीदार असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी केवळ महत्त्वाच्या १०९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. अजमल कसाब आणि या खटल्यातील सहआरोपी फहीम अन्सारी आणि सबाहुद्दीन अहमद यांच्याविरुद्ध गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांचा लेखाजोखाही उज्ज्वल निकम यांनी मांडला. पाच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) उपकरणेही हस्तगत करण्यात आली असून ती विश्लेषणासाठी अमेरिकेला पाठविण्यात आली आहेत.यापैकी दोन जीपीएस ताज महाल हॉटेलमधून तर ट्रायडण्ट (ओबेरॉय) आणि नरिमन हाऊस येथून प्रत्येकी एक उपकरण हल्ल्यानंतर हस्तगत करण्यात आले आहे. मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी दहशतवाद्यांनी सागरी आणि भूमार्ग यांचा वापर केला त्याचा डेटा पाहून तज्ज्ञांकडून व्यक्त होणाऱ्या मतांवर आपली मदार आहे, असेही उज्ज्वल निकम यांनी न्यायालयास सांगितले.
Post a Comment