अक्कलदाढेनं कळणार कसाबची अक्कल.....
Friday, 24 April 2009
पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब ‘अल्पवयीन’ आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी कसाबच्या हाडांची आणि दातांची चाचणी करण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांनी रेडियोलॉजिस्ट आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सकांकडून कसाबच्या हाडांची (ऑसिफिकेशन) आणि दातांची चाचणी करण्याचे आदेश तुरूंग प्रशासनाला दिलेत. या चाचणीचा अहवाल २८ एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले. २८ एप्रिल म्हणजेच मंगळवारी कसाबवर सर्वात पहिल्यांदाच उपचार करणारे नायर रुग्णालयाचे डॉक्टर आणि आर्थर रोड तुरूंग अधीक्षकांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. अभियोग पक्षाने एका अर्जाद्वारे कसाबविरुद्ध आरोप निश्चित होण्याआधी त्याच्या वयाबाबतचा मुद्दा निकाली काढण्याची आणि त्याबाबत चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर आज निर्णय देताना न्या. तहलियानी यांनी ज्युविनाईल जस्टीस एक्टच्या कलम ७ (ए) नुसार कसाबच्या अल्पवयीन असण्याच्या दाव्याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी रेडियोलॉजिस्टद्वारे त्याच्या हाडांची आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सक त्याच्या दातांची चाचणी करण्याचेही निर्देश तुरूंग प्रशासनाला दिले. अटकेच्यावेळी जखमी झालेल्या कसाबला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याने स्वत:विषयी माहिती दिली होती. त्यात त्याच्या जन्मतारखेचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे त्याला पहिल्यांदा आर्थर रोड तुरूंगात पाठविण्यात आले तेव्हाही त्याची व्यक्तिगत माहिती तुरूंग प्रशासनाकडून नोंदविण्यात आली होती. यामुळे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी नायर रुग्णालयाच्या कसाबवर उपचार करणा-या डॉक्टरांची आणि आर्थर रोड तुरूंग अधीक्षकांची साक्ष नोंदवून घेण्याची मागणी केलीय. कोर्टाने ही मागणी मान्य केली असून दोघांना २८ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत. कसाब हा अल्पवीयन असल्याचं सिद्ध झालं तर मग हा खटला अल्पवयीन आरोपींसाठी तयार करण्यात आलेल्या कोर्टामध्ये वर्ग करण्यात येईल आणि या कोर्टात कसाबचा गुन्हा सिद्ध झाला तरी त्याला जास्तीत जास्त तीन वर्षच शिक्षा होईल असं कसाबचे अब्बास काझ्मी यांनी म्हटलंय.
0 comments:
Post a Comment