परदेशी तज्ञांचीही साक्ष नोंदवण्यात येणार....

Sunday, 19 April 2009


अबू इस्माईल आणि कसाबला खरं तर मलबार हिलवर हल्ला करायचा होता. या हल्ल्याचा प्लॅन फक्त ईस्माईलला माहीत होता. कसाबने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने आपण कुढे जायचंय आणि काय करायचं अशा प्रश्न विचारल्याचं म्हटलंय. याअर्थी प्लॅन फक्त अबू इसामाईललाच माहिती होता हे स्पष्ट होतं. मलबार हिल येथे पोहोचण्यापूर्वीच अबू इस्माईल पोलीस चकमकीत मारला गेला. यामुळे प्लॅन अयशस्वी ठरला. मुंबईवरील हल्ल्यात कसाब आणि त्याच्या साथीदारांचा हात आहे, हे सिद्ध करण्यासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि अन्य परदेशी तज्ज्ञांसह १०९ हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. साक्षीदारांमध्ये ३० हून अधिक साक्षीदार हे प्रत्यक्षदर्शी असून त्यांनी कसाब व त्याच्या साथीदारांना हॉस्पिटल, हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बेछूटपणे गोळीबार करताना पाहिलंय. दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये एके-४७ रायफल, आरडीएक्सचे बॉम्ब पेरणे, रॉकेट लॉन्चरचा वापर करणे, जीपीएस सॅटेलाईटचा वापर करणे आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले होते असं विशेष सरकारी वकील उज्वल निकम कोर्टाला सांगितलं. दहशतवाद्यांना सरकारी अधिका-यांची दिशाभूल कशी करायची याचं देखील प्रशिक्षम देण्यात आलं होतं. याचाच एक भाग म्हणून कसाब मी ‘बच्चा ’आहे, असा आव आणून कोर्टाची दिशाभूल करत असल्याचं निकम यांनी कोर्टाला सांगितलं. या खटल्यात १२ एफआयआर नोंदविण्यात आलेत.यातील सातमध्ये कसाबचा प्रत्यक्ष सहभाग आहे. कुबेर या बोटीवरील खलाशांची हत्या करणे, सीएसटी स्थानकात बेछूट गोळीबार करणे, टॅक्सीत स्फोट घडविणे, कामा हॉस्पिटलजवळ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करणे, स्कोडा गाडी चोरणे, चौपाटीवर पोलिसांवर गोळीबार करणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी पाच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) उपकरणं हस्तगत केली असून ती विश्लेषणासाठी अमेरिकेला पाठविण्यात आली आहेत. यापैकी दोन जीपीएस ताज महाल हॉटेलमधून तर ट्रायडण्ट (ओबेरॉय) आणि नरिमन हाऊस येथून प्रत्येकी एक उपकरण हल्ल्यानंतर हस्तगत करण्यात आले आहे.

0 comments:

About This Blog

Lorem Ipsum

  © Free Blogger Templates Nightingale by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP